कडेगांव तालुक्यातील येवलेवाडी येथिल टोल नाका हटाव मोहीम राबविणार : डी एस देशमुख*
सातारा विजापूर चार पदरी सिमेंट महामार्ग 166 E मध्ये येवलेवाडी येथील टोल नाका सुरू करणे म्हणजे केंद्र सरकारने दिवसा- ढवळ्या दरोडा टाकण्या सारखे आहे. असे मत कडेगाव पलूस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे विधानसभा अध्यक्ष व पाणी संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख यांनी व्यक्त केले आहे. या पूर्वी ह्या महामार्गावरील सुर्ली घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी आंदोलन केले होते, परंतू सुर्ली घाटाचे काम दोन पदरी च झाले आहे. घाटातील नाल्याची कामे पूर्ण झाली नाहीत. शिवाय रेणावी घाटाचे काम चार पदरी झाले नाही, हायवे कडेला तोडलेली झाडे नियमानुसार लावलेली नाहीत, त्यामुळे महामार्ग ओसाड, भकास झाला आहे. कडेगाव ते ओगलेवाडी महामार्गावरील जाचक स्पिड ब्रेकर यावर उपाय योजना केल्या नाहीत, त्या बाबतीत लोकांच्या तक्रारी येत आहेत. कडेगाव स्टँड परिसरातील छ. संभाजी महाराज चौक येथे रात्री पुरेसा उजेड पडत नाही तिथे हायमास्ट लॅम्प बसविले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण कामे, सुर्ली, रेणावी, घाटाचे चौपदरीकरण होत नाही व नागरिकांचे समाधान होत नाही तोपर्यंत टोलनाका हटाव मोहीम राबविण्यात येणार असून व टोल वसूली सुरू करून देणार नाही. येत्या काही दिवसांत कडेगाव प्रांत डॉ देशमुख साहेब यांनी वरील विषयानुसार मिटिंग सर्व संबंधित अधिकारी व पाणी संघर्ष समिती यांची बोलविली आहे, त्या मीटिंग मध्ये योग्य न्याय मिळाला नाही तर पाणी संघर्ष समिती तर्फे, राष्ट्रवादी सह विरोधी पक्षनेते व नागरिकांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, यावेळी उपस्थित पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यु वरूडे, प्रविण करडे, जीवन करकटे, व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते उपस्थित होते.