धोकादायक इमारती :संरचनात्मक तपासमी आणि पुनर्बाधणी...जमीर लेंगरेकर व रूषभ कर्नावट लिखीत पुस्तक सहकारी सोसायटी यांना उपयुक्त
*"धोकादायक इमारती : संरचनात्मक तपासणी आणि पुनर्बांधणी"*
हे रुषभ कर्नावट आणि जमीर लेंगरेकर लिखित पुस्तक सहकारी सोसायट्यांना उपयुक्त ठरणारे खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. रुषभ कर्नावट हे पेशाने स्ट्रक्चरल इंजिनिअर आहेत व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. तर जमीर लेंगरेकर उल्हासनगर, पनवेल, सोलापूर या महानगरपालिकात व नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त पदांवर काम केल्याचा उत्तम प्रशासकीय अनुभव असलेले अधिकारी आहेत.
आत्तापर्यंत या विषयातील अस्सल आणि पद्धतशीर माहिती मराठीत उपलब्ध नव्हती. ती कमतरता या पुस्तकाने भरून काढली आहे. या पुस्तकात केवळ स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय हे सांगितले गेलेले नाही, तर या विषयाशी संबंधित मानवी पैलूंनादेखील स्पर्श करण्यात आला आहे. त्यामुळे या माहितीला पाठयपुस्तकाचे स्वरूप न येता सामान्य वाचकांशी लेखकद्वयींनी साधलेला संवाद असे रूप आले आहे.
पावसाळ्यात इमारती कोसळण्याचे प्रमाण हे अधिक असते. ऊन-वारा-पाऊस यांचा मारा झेलून जीर्ण झालेल्या इमारतींना संजीवनी कशी देता येईल याची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात दिली आहे.
या संदर्भात शासकीय नियम काय आहेत? धोकादायक इमारती कोणकोणत्या श्रेणींमध्ये विभागल्या जातात? इमारत धोकादायक आहे हे ठरवण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या जाव्यात? या इमारतींचे ऑडिट करणाऱ्या इंजिनियर्सचा दृष्टिकोन काय असावा अशा सगळ्या संवेदनशील मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानसचिव अशा अनेकांच्या शुभेच्छा या पुस्तकाला लाभल्या आहेत हा आणखीन एक दुग्धशर्करायोग यानिमित्ताने घडून आला आहे.
हा संवेदनशील विषय वाचकांपुढे आणून ग्रंथालीने साहित्यविश्वात मोलाची भर घातली आहे.