शेत वाचवा अभियान" उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, कडेगाव येथे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर.
कडेगाव दिनांक 15 जून, भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव येथे थीम: सदृढ:मृदा, सदृढ:पीक, समृद्ध:शेतकरी या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर पार पडले. सदर शिबिराचे आयोजन कृषी महाविद्यालय कडेगाव आणि भा.कृ.सं.प. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था माटुंगा (पूर्व), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. मार्गदर्शन शिबिरा करिता माननीय श्री विनायक काशिद (सदस्य महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद ,पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.सुंदरमूर्ती सी. हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
त्यांच्यासोबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रभू, तांत्रिक अधिकारी डॉ. मनोज अंबारे, श्री.आनंद जाधव आणि श्री.केतन कुमार माने हे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून उपस्थित होते. तसेच मा.श्री.संभाजी पाटकुरे तालुका कृषी अधिकारी व मा.श्री.अविनाश पवार मंडल कृषी अधिकारी कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आदी उपस्थित होते. सदर मार्गदर्शन शिबिरा करिता डॉ.रणवीर पवार (उपप्राचार्य शिक्षण) व डॉ.युवराज जाधव (उपप्राचार्य प्रशासन) तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
मार्गदर्शन शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व.डॉ.पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पुढे कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना डॉ.युवराज जाधव (उपप्राचार्य-प्रशासन) यांनी केले.
शेती वाचवा अभियानासाठी डॉ.अशोक भारिमाल, प्रधान-शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन तंत्रज्ञान संस्था, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या नियोजनांतर्गत डॉ.एस के शुक्ला संचालक, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान तथा प्रशिक्षण संस्था मुंबई व प्राचार्य डॉ.अधिकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील एकूण 30 गावांमध्ये हा कार्यक्रम राबवणार जाणार असून त्यापैकी कडेगाव तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. कडेगाव तालुक्यामधील दहा गावांमध्ये प्रधान शास्त्रज्ञ, वरिष्ठ शास्त्रज्ञ व तांत्रिक अधिकारी इ. महाविद्यालयातील कृषीदूत व कृषीकन्या यांच्यासोबत खेड्यापाड्यांमध्ये "सदृढ मृदा: सदृढ पीक: समृद्ध शेतकरी" या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख पाहुणे मा.श्री. विनायक काशिद यांनी सदर उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयांमध्ये मला उपस्थितांच्या मार्गदर्शनासाठी निमंत्रित केल्यामुळे स्वतःला खूप नशीबवान समजतो अशी भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मृदा संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत मातीचे आरोग्य सुधारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने स्वतःची शेती/माती सशक्त करावी. कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशी नुसार रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. वेळोवेळी माती आणि पाणी परीक्षण करावे तसेच पिक उत्पादनांचा खर्च कमी करून शाश्वत शेतीचा अवलंब करावा असे मत यावेळी स्पष्ट केले. अंतिम वर्ष प्रवेशित कृषी दूत व कृषी कन्या यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक शेती व शाश्वत शेती पद्धतीला व्यावसायिक दृष्ट्या प्रोत्साहन कसे द्यावे हे सांगितले.राज्यातील कृषी विद्यापीठाच्या वतीने केले जाणारे विविध उपक्रम, प्रयोग,संशोधन,नवनवीन तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी याची माहिती यावेळी प्रामुख्याने दिली.
पुढे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. यामध्ये श्री.आनंदराव पवार, श्री.शैलेश पवार, श्री.सुरज पवार, श्री
दत्तात्रेय मलवडकर, श्री.अनिल गुरव, श्री.सदाशिव माळी व श्री.संभाजी गीते इ. होते.
पुढे प्रधान शास्त्रज्ञ मा.डॉ.सुंदरमूर्ती सी. यांनी भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. परंतु दिवसे दिवस मातीची उत्पादकता घटत आहे यामध्ये रासायनिक खतांचा अमर्यादित वापर प्रमुख कारण असल्याचे सांगितले. जमिनीची उत्पादकता सुधारण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणे गरजेचे आहे म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती हिरवळीची खते व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आदींचा अवलंब करावा असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी मृदा परीक्षण करावे जिवाणू खतांचा वापर करावा व रासायनिक खतांचा वापर कमी करून मातीचे आरोग्य सुधारावे असा कानमंत्रही यावेळी देण्यात आला.
पुढे मा.श्री केतनकुमार माने यांनी अंतिम वर्ष कृषी पदवी प्रवेशित विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उद्योजकता विकास घटक स्पष्ट केला. यामध्ये शेतकऱ्यांनी यशस्वी बनण्यासाठी शाश्वत शेती बरोबर उद्योग जगतेची जोड देणे गरजेचे असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी विविध केंद्रशासन तथा राज्य शासन पुरस्कृत विविध कृषी उद्योगांची माहिती दिली व उपस्थिततांचे मनोबल वाढवले.
यावेळी प्रगतशील शेतकरी व अग्रेसर भाजीपाला उत्पादक मा.श्री.शैलेश पाटील यांनी निरोगी आरोग्यासाठी समृद्ध मृदा राखावी व मृदा आरोग्य टिकवणे देखील गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी स्वतः राबवत असलेल्या विविध नैसर्गिक शेती पद्धतीचे उदाहरणे स्पष्ट ही केली.
सदर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन कृषी विस्तार शिक्षण विभागांतर्गत करण्यात आले होते यासाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.अमृतराव पाटील, प्रा.सचिन माने, डॉ.रोहित पवार, प्रा.महेश मोहिते, प्रा.श्याम माळी, डॉ.गोविंद शिऊरकर यांनी परिश्रम घेतले. सदर मार्गदर्शन शिबिराकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी अंतिम वर्ष प्रवेशित विद्यार्थी तसेच परिसरातील सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारे प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षे प्रवेशित विद्यार्थी कु.सुजित यादव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम समन्वयक डॉ.चारुदत्त औताडे यांनी मानले.